प्रेमाच्या भूतांनी बदललेली मानसी
रात्रीचे दोन वाजले होते… संपूर्ण शहर झोपेत होते, पण मानसी मात्र गच्चीत बसून चंद्राकडे टक लावून बघत होती. गार वारा केसांतून मोकळा फिरत होता, पण तिच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. हसावं की रडावं, जगावं की मरावं हेच समजत नव्हतं...
आठवणींचा भार फार जड असतो… काही दिवसांपूर्वी ती किती आनंदी होती, प्रेमाने भारलेली होती. तिच्या आयुष्यात एक खास व्यक्ती आली होती. तो तिच्यासाठी फक्त प्रियकर नव्हता, तर एक स्वप्न होतं. त्याच्या प्रत्येक बोलण्यात, स्पर्शात, अस्तित्वात तिला एक नवी उर्जा मिळत होती. पण अचानक तो दूर गेला… काही कारण नसताना, कोणताही निरोप न देता...
पहिल्या काही दिवसांत तिला वाटलं, तो परत येईल. फोन वाजेल, आणि समोर त्याचं नाव चमकेल. पण नाही… दिवसांमागून दिवस गेले, आठवड्यांवर आठवडे गेले, पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. हळूहळू तिच्या मनात प्रश्न वाढू लागले "खरंच प्रेम असं संपतं का? की तो फक्त एक मोह होता?"...
त्या रात्री तिच्या मनात खूप विचारांचं काहूर उठलं होतं. आयुष्य नकोसं वाटत होतं. "प्रेम जर असं वेदना देत असेल, तर त्याचा उपयोग काय?" तिला स्वतःचं अस्तित्वच व्यर्थ वाटू लागलं. ती आकाशाकडे पाहत राहिली… डोळ्यांतून अश्रू गळत होते.
आणि मग… अचानक एक विचार आला "प्रेम संपत नाही, आपणच त्याला संपल्यासारखं मानतो!"
प्रेम कधीच मरणारं नाही. ते आपल्या आठवणींमध्ये, आपल्या हृदयात कायम जिवंत राहतं. कदाचित तो व्यक्ती दूर गेला असेल, पण प्रेमाचा स्पर्श, त्याने दिलेल्या आठवणी आणि त्यातून मिळालेलं जगण्याचं बळ ते तसंच राहणार होतं.
त्या रात्री पहिल्यांदा तिला धीर मिळाला… कोणाचा, ते माहीत नाही, पण मिळाला. कदाचित प्रेमाच्या भूतांनीच तिच्या कानात कुजबुज केलं होतं "तू तुटलेली नाहीस, तू अजूनही पूर्ण आहेस!"
त्या रात्री मानसीनं ठरवलं… आता आयुष्य थांबवायचं नाही. ती स्वतःसाठी जगायचं ठरवू लागली. हळूहळू तिचं हसू परत आलं, मनातली ओलसर वेदना फुलून आली, आणि ती स्वतःच्या आयुष्याला नवीन वळण द्यायला लागली.
आता ती पुन्हा आनंदी आहे, कारण तिला समजलंय प्रेम नेहमी आपल्या सोबत असतं, फक्त त्याला वेगवेगळ्या रूपात स्वीकारायची ताकद आपल्यात असावी लागते!
✍️ प्रेमाच्याभूतां
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा